ब्लॉग्ज

नववर्ष स्वागत समिती…. एक सांस्कृतिक जागरण !!

नवीन वर्ष, नवीन आशा
नव्या जगाची नवीन भाषा



हल्ली भाषाच बदलली आहे, प्रत्येकाची, प्रत्येकसाठीची आणि प्रत्येकवेळेचीसुद्धा. नवीन वारे वाहू लागले, असे आपली आधीची पिढी नेहमी म्हणायची, त्यांनी बदल अनुभवला, कारण त्यांच्यासाठी हा बदल टप्प्याटप्प्याने घडत गेला, पण आम्हला तर रोज घडणाऱ्या घटनांमधून आमच्या संस्कृतीवर होणारा मारा जाणवतोय. व्यक्ती स्वातंत्र्यापुढे आमची सामाजिक पाळंमुळंच कापली जाताहेत, आणि हे सगळं आमच्या नकळत आमच्या गळी उतरवलं जातं आहे. जिथे आमची ही अवस्था तिथे आमच्या पुढच्या पिढीची काय गत असणार. त्यांच्यासाठी नवे वारे, जास्त सहज सोपे आणि आवडीचे होणे स्वाभाविकच.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक जागरूकता टिकवून ठेवणे, ती जोपासणे आणि त्याच्या सावलीत स्वतःला आणि समाजाला पुढे नेणे हे आव्हान आहे आजच्या समाजापुढचे. हिंदू समाजात प्रत्येक सणाला निसर्गाशी, अभ्यासाशी, समाजातल्या प्रत्येक घटकांशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी मनाशी जोडले आहे. एका सणाच्या मागे केवढातरी अभ्यास लक्षात येतो. कारण आपल्या संस्कृतीत सगळ्यात जास्त महत्व हे समाजमनाला दिले जाते. आपला कुठलाही व्यवहार व्यक्तीसापेक्ष न राहता तो समाज हिताय, समाजभान ठेवून करणे अपेक्षित आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, ज्या दिवसापासून ब्रम्हदेवाने सृष्टीच्या रचनेला सुरवात केली, भगवान विष्णूंचा मस्त्य अवतारात शंकासुरचा वध केला तो हाच दिवस, पुढे भगवान रामाने दक्षिण भारतात वालीचा वध करून अशासनकर्त्याचा नायनाट होतो हे जगाला दाखवून दिले तो ही हाच दिवस, भगवान राम लंकेवर विजय प्राप्त करून अर्थात शत्रूचा नायनाट, बंदिस्त पत्नीला धर्माने सोडवून, आपल्याला मिळालेल्या आज्ञेचे अर्थात वचनपूर्तता म्हणून १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तो हाच दिवस. शकांच्या हल्ल्यावर शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यात प्राण फुकून त्यांना परास्त केलं तोही हाच दिवस. भारतीय कालगणना सुरू झाली तो ही हाच दिवस….शालिवाहन शके. इतक्या घटना वेग-वेगळ्या काळात घडल्या, दिवस तोच होता. त्यामुळे भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व या दिवसाला प्राप्त झाले आहे. दक्षिणेत उगादी, महाराष्ट्रात गुढी पाडवा तर सिंधी बांधव चॅटींचांद या नावाने हा दिवस साजरा करतात.
भारतीय संस्कृतीत रंगावली, रांगोळीला अनन्यसाधारण महत्व आहे. रोजच्या जगण्यात दाराबाहेर असलेली सुदंर, सुबक, रंगीबेरंगी रांगोळी व्यक्तितील कलात्मकता, सृजनता जीवंत ठेवते. ही रांगोळी प्रत्येक हिंदू घराच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. ह्या रंगाच्या माध्यमातून आम्ही बोलतो, आम्ही घडतो, आम्ही सांगतो. रांगोळीचे चटकदार रंग आमच्या आनंदाचे प्रतीक आहेत. ह्या महारांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश द्यायला सुरवात झाली आणि बघता-बघता ५०० रांगोळी सख्या एकत्रित आल्या. स्वयंसेवक बंधू एकत्र आले, सारा समाज एकत्र आला. महारांगोळी बघायलासुद्धा समाज एकत्र आला. दरवर्षीचा वेगळा विषय महारांगोळी साकारणाऱ्या व्यक्तींपासून बघणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला विचारधन देऊ लागली. आमची सांस्कृतिक मुळं आता रुजू लागली.
ढोल-ताशा, असंख्य वाद्य, एकत्रित नृत्याविष्कार, पदन्यास, सामूहिक गायन आणि वादन प्रत्येक कालाकारातील भारतीय मनाला आव्हान देणारा ठरला. प्रत्येक केलेचे सादरीकरण, त्याची नजाकत जरी वेगळी असली, त्याची लय वेगळी असली, ताल वेगळा असला तरी एक ठेका त्यात कायम होता, आहे, राहणार तो म्हणजे भारतीयत्वाचा. कलाकार एकत्र आलेत, सादरीकरण एकत्र झाले, आणि समाज बांधला गेला. भारतातील दक्षिणगंगेचा काठ आता सांस्कृतिक महोत्सवाचे माहेरघर ठरले. दक्षिणेची गंगा म्हणवले जाणारी गोदावरी नदी नासिक शहराची जीवनदायिनी आहे. गंगेच्या काठावर अर्थात पाडवा पटांगणावर बहरणारा हा उत्सव आता नाशिकची ओळख बनला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे नवीन अमर्याद संधींची पहाट, उन्मेष, आनंद, नव्या विकासाची, नव्या संकल्पनांची नांदी आहे. अशा पहाटे जेव्हा सगळा समाज एकत्रित येतो, नटून-थटून त्याचे स्वागत करतो, तेव्हा तो समाज येणाऱ्या संधीला नवंसिद्धीसाठी तयार होतो. मनुष्य हा एकुणातच समाजिक प्राणी आहे, त्यामुळे स्व आनंदा बरोबरच चित-परिचित समाज बांधव त्याच उत्साहाने भेटल्यावर मिळणारा आनंद स्वाभाविकच द्विगुणित होतो.हे फक्त नववर्षाचे स्वागत नाही तर स्वतःच्याच आयुष्याकडे नव्या उमेदीने पाहायला शिकवणारी स्वतःच्या आयुष्याचा उत्सव साजरा करायला शिकवणारी स्वागत यात्रा आहे.
उत्सवाचा महोत्सव होणे म्हणजे समाजाने एकत्र येणे, आपल्या वैयक्तिक आनंदा बरोबरच आपली सामाजिक भावना जागृत करणे, ती जपणे आणि वाढवणे हे प्रत्येक भारतीय उत्सवाचे मूळ आहे. आम्हला भाषेची अडचण कधीच जाणवत नाही, कारण समाजाची विविधता हेच आमची शक्ती आहे. व्यक्तिनिष्ठ समाज कधीच प्रगती करत नाही, तर समाजनिष्ठ व्यक्ती मात्र कायम प्रगती करतो, प्रगती स्वतःची आणि समाजाची. सांस्कृतिक धरोहर प्रत्येक समाजाचे, देशाचे मुळ आहे, वृक्ष तेव्हाच बहरेल, फुलेल, डेरेदार होईल जेव्हा त्याची मुळं मातीत रुजलेली असतील, हेच काम नववर्ष स्वागत समिती सात्यताने करते आहे.
चला एकत्रित येऊ या, उत्सव साजरा करू या.

Scroll to Top